सोलापूर: कोरोनाने मरण पावलेल्यांवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त सुनील माने यांनी दिली. यामुळे कोरोना मृतांच्या अंत्यंस्कारातील सामाजिक संस्थांनी दुकानदारी बंद झाली. याबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिकेव्दारे प्रकाश टाकला होता.
कोरोनाने मरण पावलेल्या मृतदेहांवर कोविड-१९ च्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत असल्याने महापालिकेने यापूर्वी सेवाभावी सामाजिक संस्थांना परवानगी दिली होती. पण नातेवाइकांच्या तक्रारी वाढल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी या संस्थांची परवानगी रद्द केली. आता अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. महापालिकेने विद्युत व गॅसदाहिनी कार्यान्वित केली आहे. कोरोनाच्या संसर्गाने मरण पावलेल्यांवर विद्युत किंवा गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापुरात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही बरेच घटले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी झाला आहे. ग्रामीण भागात बाधित झालेले रुग्ण शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जातात. कोरोना संसर्गाने मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधितांनी शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या महापालिकेच्या साथरोग दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त माने यांनी केले आहे.