मंगळवेढा : प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी गणेशवाडी ( ता मंगळवेढा) येथील झेडपी शाळेस सकाळीं १०.३० वाजता अचानक भेट दिली. दरम्यान शाळेत एकुण पाच कार्यरत शिक्षकांपैकी चार शिक्षक उपस्थित होते तर एक शिक्षक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. सदर शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे. इतर चार शिक्षकांकडे दैनिक टाचण नव्हते, याबद्दल त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी पदभार घेतल्या पासून जिल्ह्यातील झेंडपी शाळाना अचानक भेटी देऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मोहीम उघडल्याने अनेकांना शिस्त लागली आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्याची गुणवत्तेत आघाडी असावी हे एकमेव ध्येय डॉ लोहार यांनी ठेवले असून त्या दृष्टीने ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. दरम्यान मंगळवेढा तालुक्यात त्यांनी यापूर्वी दिलेल्या अचानक भेटीत गैरहजर असणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली आहे. गणेशवाडी येथे भेट दिली असता शाळेतील सर्व मुले शाळेच्या मैदानात खेळत असल्याचे निदर्शनास आले.
विद्यार्थ्यांची उपस्थिती ८० % होती. शिक्षणाधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगूज केले असता विद्यार्थ्यांनी मनमोकळे पणाने संवाद साधला असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. आजादी का अमृतमहोत्सव, वसुंधरा अभियान व सूर्यनमस्कार या उपक्रमांचा आढावा घेऊन कोविड प्रादुर्भाव परिस्थिती लक्षात घेउन मास्क वापरणे , सॅनिटायझर वापर करणे, व गर्दी न करण्याबाबत सूचना केल्या.