सोलापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रकिया संघाच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर दूध संघाचे श्रेष्ठी नेते आणि संचालकांची पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहावर खलबते झाली. विशेष म्हणजे चक्क पायरीवर बसून या सर्व नेत्यांची चर्चा रंगली.
दरम्यान, निवडणुकीविरोधात काही संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सुनावणीचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार दूध संघाच्या अध्यक्षपद कोणाला द्यायचे याबाबत निरोप देणार असल्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले.
पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार दिलीप सोपल, आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे, दिलीप माने, बबनराव आवताडे आदी उपस्थित होते. राजन पाटील म्हणाले, या बैठकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांनाही निरोप देण्यात आला होता. पण त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही.
काही संचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. संघाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास फारसे लोक उत्सुक दिसत नाहीत. कारण हे शिवधनुष्य आहे. उद्याच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष असेल. अध्यक्षपदाचा उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार ठरविणार आहेत. त्यांच्याकडून सकाळी निरोप येईल. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल.