सोलापूर : सोलापुरात उकाडा कायम असून, गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमानात काहीशी वाढ झाली. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. पंधरा दिवसापासून उन्हाचे चटके जरा जास्तच बसू लागले आहेत. शुक्रवारी तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचला असून किमान तापमान २६.९ एवढे नोंदविले गेले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, मार्च महिन्यात ३७ अंशावर पोहोचले तापमान एप्रिल महिन्यात ४० अंशापर्यंत पोहोचले होते. मात्र मे महिन्याच्या सुरूवातीपासून तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे पुढे नोंदले गेले आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडा वाढल्याने सोलापूरकर चांगलेच तापले आहे. या महिन्यात सोलापूरचे तापमान दुसऱ्यांदा ४३ अंशावर पोहोचले आहे.
एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने तापमानाचा पारा घटला होता. मात्र त्यानंतर तापमान चांगलेच वाढले. उष्माघातापासून बचवा करण्यासाठी प्रतिबंधात्म उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी उन्हात घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.