सोलापूर : गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व प्राधिकरणाच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी योगदान दिले आहे, सर्व अधिसभा सदस्यांच्या योगदानामुळेच विद्यापीठाची प्रगती ही होत राहते, या सर्वांचे त्याबद्दल मी आभार मानते. कोणतेही विद्यापीठ आपल्या कार्यक्षेत्रावर अथवा संख्येवर मोठे ठरत नसून तर गुणवत्तेमुळे संबंधित विद्यापीठ मोठे होत असते. आपले विद्यापीठ जागतिक स्तरावर पोहोचले आहे. पेटंटची संख्या वाढून ती १४ झाली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रमामध्येही विद्यार्थ्यांनी भरारी घेतली आहे. इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातूनदेखील विद्यापीठ वेगळेपण सिद्ध करत असल्याचेही कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासनाकडून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधिसभा आणि विद्यापरिषद सदस्यांचा सन्मान करण्यात आला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते सर्वांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधिसभा आणि विद्यापरिषद आदी सर्व प्राधिकरणांची मुदत 31 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे या सर्व सदस्यांना एकत्र बोलावून त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले.
यावेळी वालचंद महाविद्यालयातील डॉ. चंद्रकांत चव्हाण, संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ विकास घुटे, प्रभारी अधिष्ठता विष्णू शिखरे, सिद्धेश्वर पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने आदी सदस्यांनी मनोगत व्यक्त करत विद्यापीठाच्या विकासासाठी आम्हाला योगदान देता आल्याची भावना व्यक्त केली.