सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ जिल्हा परिषदेच्या २५० शाळा दत्तक घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य व गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
केंद्र शासनाने विद्यापीठाला विद्यांजली उपक्रम राबविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्र. कुलसचिव डॉ. सुरेश पवार, अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. शिखरे, प्रा. डॉ. एस. पी. राजगुरू सहभागी झाले होते. विद्यांजली उपक्रमात जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेण्यात येतील, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक जबाबदारी व समुदायाच्या सहायाने शाळांना पायाभूत सुविधा व गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून मजबूत करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. १५ दिवसांत शाळांची निवड करण्यात येईल. जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या जवळ असणाऱ्या दोन शाळा व ११५ महाविद्यालये दत्तक घेण्यात येतील.
शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षकांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय स्वच्छ सुंदर शाळांमुळे आला आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठाचा विद्यांजली उपक्रम यशस्वी करू, असे सीईओ स्वामी यांनी यावेळी आश्वासन दिले.
हा होईल बदल
महाविद्यालये व शाळा दत्तक घेतल्याने कोरोनामुळे जी मुले घरी बसून शिक्षण घेत आहेत त्यांना चांगली मदत होईल. तसेच नमामी चंद्रभागा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नदीकाठच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेता येणार आहे. विद्यांजली उपक्रमात शाळेतील मुला- मुलींचा आहार, गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक मार्गदर्शन व सुविधा देण्यात येणार आहेत.