सोलापूर : मतदार याद्यांमध्ये तांत्रिक चूक अत्यंत नगण्य, दुबार मतदारविरहित मतदार यादी, तसेच शंभर टक्के फोटो असलेली मतदार यादी या कामामुळे सोलापूरच्या उपजिल्हा निवडणूक कार्यालयाचे काम संपूर्ण राज्यात नंबर वनवर पोहोचले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये सोलापूर जिल्ह्याचे काम पहिल्या क्रमांकावर आहे.
सध्या सोलापुरात ३५ लाख ७२ हजार ७९२ एकूण मतदार आहेत. यात १८ लाख २४ हजार ६४ हजार ६७६ पुरुष मतदार, तर १७ लाख सात हजार ९३७ महिला मतदार आहेत. वर्षभरात एक लाख २५ हजार ५२६ नवे मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे, मतदार नोंदणीसाठी तब्बल ९२ हजार नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले.
वर्षभरात साधारण ६८ हजार ९३० मतदारांची नावे वगळली आहेत. २० हजार ७५१ मतदारांनी दुरुस्तीसाठी अर्ज केले. चार हजार १७३ मतदारांनी त्यांचे नाव दुसऱ्या मतदारसंघात समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले. १५ जानेवारी २०२१ च्या तुलनेत यंदा ७९ तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली आहे. या सोबत ३० हजार १५६ पुरुष मतदार, तर ३६ हजार ९९२ महिला मतदारांची नावे वाढली आहेत. असे एकूण ६७ हजार नवीन मतदार वाढले आहेत.
दुबार नावे वगळली
अधिक माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले, नवीन मतदार नोंदणी मोहीम राबवताना अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजिले. १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेतल्या. वाड्या- वस्त्यांवर जाऊन मतदार नोंदणी मोहीम राबवली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मोहिमेत सामावून घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजिले. यासोबत तृतीयपंथी बांधवांकरिता विशेष मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबवले. त्यासोबत देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा विशेष कॅम्प घेतले. मतदार यादीत ज्यांचे फोटो नाहीत, त्यांच्या घरी जाऊन फोटो अपडेट करून घेतला. सर्व दुबार नावे वगळली. या सर्व उपक्रमांमुळे सोलापूरची मतदार यादी निर्दोष बनली आहे.