आप्पासाहेब पाटील
सोलापूर : जिल्ह्यात विविध गुन्ह्यांत २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे २२०७ गुन्हेगार गेली काही वर्षे पोलिसांना गुंगारा देत आहेत. सर्व संशयित आरोपी पाहिजे आरोपी आहेत. हे गुन्हेगार पोलिसांच्या हाती सापडत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ५२ आरोपींना पकडण्यात यश मिळविले आहे.
सोलापूर जिल्ह्यात २५ पोलीस ठाणी आहेत. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, सोलापूर तालुका, मोहोळ, माढा, करमाळा या पोलीस ठाण्यांत सर्वाधिक एकूण पाहिजे आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शिवाय काही पोलीस ठाण्यांतील संशयित आरोपींना न्यायालयाने फरार घोषित केले. अनेक आरोपींनी जामीन मिळाल्यानंतर ते जिल्हा सोडून बाहेरच निघून गेले आहेत. संघटित गुन्हेगारीसह खून, लूटमार, चोरी, मटका प्रकरणात संशयित आरोपी फरार आहेत. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलीस रात्रंदिवस काम करीत आहेत.
--------------
अनेकांनी घेतला परराज्यात आसरा
भांडण, मारामारी, अत्याचार, विनयभंग, खून, खुनाचा प्रयत्न, आदी गुन्ह्यांतील आरोपी कधी ना कधी सापडतात. मात्र, कधीतर अचानक सोलापुरात येऊन चोरी किंवा घरफोडी करून गेलेल्या चोरट्यांना पकडणे कठीण जाते. अशा चोरांची कोणतीही ओळख पटत नसल्याने त्यांचा तपास होत नाही. सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात चोरी केलेेले चोर पुन्हा त्याच ठिकाणी येऊन चोरी करीत नाहीत असे बोलले जाते. अनेक चोरटे, दरोडेखोर व अन्य गुन्ह्यातील आरोपींनी परराज्यात आसरा घेतल्याचे सांगण्यात आले.
---------
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे रात्रंदिवस काम...
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये पाहिजे आरोपी पकडण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा येथे प्रत्येकी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. रात्रंदिवस पोलीस त्याच्या शोधासाठी प्रयत्न करीत आहेत. गाेपनीय माहितीच्या आधारेही पोलीस अनेक ठिकाणी छापा टाकत आहेत.
-----------
मृत्यूनंतरही तपास...
गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याचे मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत पोलिसांचा तपास सुरूच राहतो. संबंधित आरोपीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तो मरण पावल्याचे सिद्ध होऊन तपास थांबला जातो. त्यामुळे अनेक प्रकरणांत आरोपींच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच ठेवला जातो.
-------------
- पाहिजे आरोपी पकडणे शिल्लक - २२०७
- जानेवारी ते जून २०२२ अखेर पकडले - ५२
------------
फरार व पाहिजे आरोपींच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके कार्यरत आहेत. काही पथके जिल्ह्याच्या विविध भागासह परराज्यांतही आरोपींचा शोध घेत आहेत. पाहिजे व फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना लवकरच यश येईल.
- सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण.
--------
दाखल गुन्हे (विभागनिहाय)
- १४१७ - सोलापूर विभाग
- ९३७ - अक्कलकोट
- ११८३ - बार्शी
- १२८३ - करमाळा
- १२९७ - मंगळवेढा
- १४०६ - पंढरपूर
- ११९७ - अकलूज
- ८६५५ - एकूण गुन्हे दाखल