पंढरपूर : श्री विठोबाची मूर्ती सुरक्षित, आषाढी एकादशीपूर्वी रुक्मिणी मातेच्या झीज झालेल्या चरणावर वज्रलेप होणार. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची ११ जून रोजी बैठक होणार असून पुरातत्त्व विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करत आषाढीपूर्वी श्री रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करण्याचा निर्णय घेण्यासंर्दभात बैठक घेणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी सांगितले.
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन अनंतकाळ मिळावे यासाठी देवाच्या आणि मातेच्या मूर्तीला वज्रलेप केला जातो. पंढरपूरमध्ये पदस्पर्श दर्शन असल्यामुळे प्रत्येक भाविकांचा हात आणि डोके देवाच्या चरणावर स्पर्श होतो. त्यामुळे कालांतराने त्यांची झीज होत असते. अशाच पद्धतीने रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज झाल्याचा प्रकार मागील काही दिवसांपूर्वी समोर आला होता. याची दखल घेत आता आषाढी एकादशीच्या पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती झीज झालेल्या ठिकाणी वज्रलेप करणार आहे.
दोन वर्षांपूर्वी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. यामध्ये सध्या विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित आहे. मात्र रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झालेली आहे. काही दिवसांपूर्वी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपुरात येऊन वज्रलेप निघालेल्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी मंदिर समितीला त्यांनी काही सूचना दिल्या होत्या.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील ग्रेनाईट काढले जाणार आहे. पुरातत्त्व विभागाने जे काही मुद्दे सांगितले आहेत त्यात ग्रेनाईट काढणे सुचवले होते. ११ जूनच्या बैठकीत मंदिर समिती याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेली आहे.