सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १६ मंडळांना विशेष शाखेने कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत. हजर राहून खुलासा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दि.१४ एप्रिल २०२२ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दि. १७ एप्रिलला जयंती मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण (नियम व विनिमय) अधिनियम २००० मधील तरतुदीस बाधा येणार नाही, याबाबत सर्व मंडळांना लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, मिरवणुकीत डीजे लावण्यात आला होता. त्याच्या आवाजाची मर्यादा तपासण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून निघणाऱ्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजाची मर्यादा तपासण्यात आली होती.
सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १६ मंडळांनी ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा जास्त आवाजात डीजे लावल्याची नोंद असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डेसिबलच्या आवाजाचा अहवाल विशेष शाखेकडे पाठविला होता. अहवालासाेबत ध्वनी तीव्रता मोजणी रिपोर्ट प्रिंट व घटनास्थळ पंचनाम्याची झेरॉक्स प्रत जोडण्यात आली होती. प्राप्त झालेल्या अहवालावरून संबंधित मंडळांना आपण केलेल्या उल्लंघनाबाबत पुढील कायदेशीर कारवाई का करू नये? अशा कारणे दाखवा नोटिसा विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अनिल लंभाते यांनी काढल्या आहेत. दिलेल्या नोटिसांवर तीन दिवसांत स्वत: हजर राहून खुलासा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशावरून डीजेच्या आवाजाला मर्यादा घालण्यात आली आहे. याबाबत संबंधित मंडळांना जयंतीच्या मिरवणूक आधी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही मंडळाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचा अहवाल संबंधित पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार सुमारे १६ मंडळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आलेल्या खुलाशावरून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
- अनिल लंभाते, सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा.
त्यामुळे जाणवला असेल आवाज
यंदाच्या वर्षी मिरवणुकीत सुमारे ६० ते ६५ मंडळांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक नियमाप्रमाणे पारंपरिक मार्गावरून काढण्यात आली होती. मिरवणूक दरम्यान एकापाठोपाठ एक गाड्याजवळ जवळच्या अंतरावर होत्या. त्यामुळे डेसिबल तपासताना आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे. संबंधित मंडळांनी आपले खुलासे सादर केले आहेत.
- बाळासाहेब वाघमारे, अध्यक्ष, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत उत्सव मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर.