सोलापूर : स्मार्ट सिटी मिशन हा भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिकस्नेही, स्थायी स्वरूपात शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी स्मार्ट सिटी हा एक प्रोजेक्ट सोलापुरात राबविण्यात येत आहे. हा प्रोजेक्टची मुदत संपत आली असताना सरकारने उर्वरित कामे करण्यासाठी मुदतवाढ देऊन बहुतांश महापालिकांना दिलासा दिला आहे. मार्चअखेर असलेली मुदत आता जूनअखेरपर्यंत देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेसाठी येत्या जून २०२३ पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित सर्व कामे त्याच्या आत पूर्ण करण्यात येतील, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून सोलापुरात ४७ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४० कामे पूर्ण झाली असून उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अद्यापही प्रलंबित आहेत. पूर्ण झालेली सर्व कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. आता या ४० कामांची देखभाल दुरूस्ती व इतर सर्व कामे महापालिका आपल्या खर्चातून करणार आहे. त्यामुळे आता महापालिकेचा खर्च वाढणार आहे. शिवाय उत्पन्न वाढीसाठीही महापालिकेला आता नवेनवे उत्पन्नाच्या स्त्रोतांचा शोध घ्यावा लागणार असल्याचेही आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले.