सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या सौद्याला चांगला दर मिळत असल्याने दुपटीने आवक वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सौद्यांमध्ये सर्वाधिक २१० रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने कर्नाटकातील शेतकरी माल विक्रीस आणत आहेत.
बाजार समितीत ६ एप्रिल रोजी पाचवा सौदा झाला. लिलावासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे आठ व्यापाऱ्यांकडे ८१० टन बेदाणा आला होता. यातील ४०५ टन बेदाण्याची विक्री झाली. ५० रुपयांपासून २२० पर्यंत बेदाण्याला भाव मिळाला. सर्वसाधारण १६० रुपये प्रति किलोने बेदाणा विकला गेला. निंबर्गी येथील सिद्धाराम माळगी यांच्या बेदाण्याला सर्वाधिक म्हणजे २२० रुपये प्रति किलो भाव मिळाल्याचे अडते शिवानंद शिंगडगाव यांनी सांगितले.
बाजार समितीत ४ मार्चला बेदाण्याच्या लिलावाला सुरुवात झाली. उद्घाटनावेळी ७५ टन बेदाण्याची आवक झाली होती. यातील ४० टन बेदाणा ४० ते ३११ रुपये प्रति किलोने विकला गेला. त्यानंतर झालेल्या लिलावात २६३ टन बेदाण्याची आवक झाली. यातील १३१ टन बेदाणा ३५ ते २०५ रुपये प्रति किलोने विकला गेला. त्यानंतर प्रत्येक लिलावाला आवक वाढत चालली आहे. सोलापूर जिल्ह्याबरोबरच कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, उस्मानाबाद येथील शेतकरी माल विक्रीला आणत आहेत.
यंदा उलाढाल वाढणार
गतवर्षी कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे हॉटेल, दुकाने पूर्ण क्षमतेने चालत नव्हती. देवदर्शन, लग्नसराई व इतर कार्यक्रमावर परिणाम दिसत होता. आता निर्बंध खुले झाल्याने बेदाण्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे यंदा उलाढाल दुपटीने वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांतून वर्तविला जात आहे.
गतवर्षी ३४ कोटींची उलाढाल
गतवर्षी ४ मार्च ते ९ डिसेंबर या काळात सौदे झाले. यात २ लाख ७९ हजार ७३ बॉक्सची आवक झाली. त्यातील १ लाख ४० हजार ६९२ बॉक्स विकले गेले. ४० ते २६५ असा प्रतिकिलोला दर मिळाला. यातून ३४ कोटी १३ लाख ७४ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली.
आतापर्यंतची आवक (टन)
- ४ मार्च : २६३
- १० मार्च: ३३९
- १७ मार्च : ४८२
- २४ मार्च : ५३४
- ६ एप्रिल :८१०