अरुण लिगाडे सांगोला : तालुक्यातील डोंगरगाव पाचेगाव येथून कवठेमहांकाळ ( नागज ) कडे जाणारा टेंभूच्या कालव्याला भगदाड पडून फुटल्यामुळे शेतकऱ्याच्या शेत शिवारात पाणीच पाणी झाले.
आज रविवारी सकाळी ही घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणीच पळाले आहे. दरम्यान, कालव्यातून मोठ्या निसर्गाने पाणी वाहत असल्यामुळे डाळिंब, बाजरी, मका उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तर कॅनाल फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून जाताना टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शाखा अभियंतांना अनेक वेळा फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. सांगोला तालुक्यातील अनेक शेतकरी निरा उजवा कालवा टेंभूचे पाणी मिळावे म्हणून टाहो फोडत असताना दुसरीकडे टेंभूचाच कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार घडल्याने पाणी उशाला आणि शेतकरी उपाशी अशीच प्रतिक्रिया उमटू लागली आहे.