सोलापूर : जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ८ तालुक्यांतील सर्व मार्गावर नाकेबंदी करून आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याशेजारील सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यात लोकांची ये-जा असल्याने सोलापूर जिल्ह्यातील संसर्ग कायम आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध आणण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आंतरराज्य व आंतरजिल्हा रस्त्यावर नाकेबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. या ठिकाणी चाचणीसाठी आरोग्य कर्मचारी नियुक्त करावेत, असे डॉ. जाधव यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
या ठिकाणी होणार चाचणी
अक्कलकोट : वागदरी, दुधनी, बार्शी : वारदवाडी, पांगरी, पिंपळवाडी, गौडगाव, धामणगाव, करमाळा : जातेगाव, कोंढार चिंचोळी-डिकसळ, कोर्टी-चिलवाडी-राशीन, आवाटी ते परांडा, माढा : टेंभुर्णी-भीमानगर, लव्हे ते परांडा, मुंगशी ते परांडा, माळशिरस : अकलूज-सराटी, नातेपुते-शिंगणापूरपाटी, दहिगाव, पिलीव, जळभावी घाट, मंगळवेढा : कात्राळ-चडचण, सोड्डी-उमदी, सांगोला : जुनोनी, शेरेवाडी-कटफळ, जत-सानंद, दक्षिण सोलापूर : बोरामणी, तामलवाडी, टाकळी-नांदणी, सादेपूर.
अशी असेल तयारी
या नाक्यांवर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्यांची थर्मल गनद्वारे टेम्परेचर, ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन तपासणी होईल. त्यानंतर ॲन्टिजेन कीटद्वारे चाचणी केली जाईल. चोवीस तास या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, पोलीस नियुक्त असतील.