सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महत्त्वाचे ३८ प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून, यात सोलापुरातील तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. सोलापूर - अक्कलकोट महामार्ग, अहमदनगर येथून येणारा पेट्रोलियम पाइपलाइनचा यात समावेश आहे. सोलापूर ते अक्कलकोटचा महामार्ग ३८ किलोमीटरचा असून, यापैकी ३५ किमीचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय दौंड ते गुलबर्गा या लोहमार्गाचे विद्युतीकरणही निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे.
‘लोकमत’ने राज्यातील या प्रकल्पाबाबतचे वृत्त सोमवारी दिले होते. यामधील सोलापूर ते अक्कलकाेट महामार्ग क्रमांक १५० हा एकूण ९९ किमीचा असून, यातील ३८ किमीचा मार्ग महाराष्ट्राच्या हद्दीतून जातो. ३८ किमीसाठी एकूण ८०७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासोबत एकूण भूसंपादनासाठी ३७८ कोटी खर्च आला असून, शंभर टक्के भूसंपादन झालेले आहे. नोव्हेंबर २०२१ अखेर हा महामार्ग पूर्ण होणे अपेक्षित होते. कोविडमुळे या महामार्गाचे काम रखडले. तसेच सोलापूर शहर हद्दीतील जमिनीचे भूसंपादन लवकर झाले नाही. यामुळेदेखील सोलापूर - अक्कलकोट महामार्गाचे काम रखडलेले होते. या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच कोयाली, मनमाड, अहमदनगर, सोलापूर पेट्रोलियम पाइपलाइनदेखील लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
रेनगरातील ३० हजार घरकुलेही पूर्ण करणार
कुंभारीच्या माळरानावर पंतप्रधान आवास योजना अर्थात रेनगर योजनेतील ३० हजार घरकुलांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घरकुलांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष असून, पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी ३० हजार घरकुले पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार येत्या ९ ऑगस्टला ३० हजारपैकी १० हजार घरकुलांचे वाटप होणार आहे. तसेच मे २०२३ मध्ये १० हजार घरकुले त्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत उर्वरित १० हजार घरकुलांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार तीनशे कोटींची मदत करीत आहे.
........................