सोलापूर : इंदोर आणि हैदराबाद येथील तज्ज्ञ इंजिनीअरच्या मार्गदर्शनाखाली बाळे रेल्वे क्रॉसिंगजवळ रविवारी सायंकाळी शेवटचा दहावा गर्डर लॉन्च झाला आहे. यासाठी रेल्वे विभागाकडून दीड तासांचा ब्लॉक केला गेला. सव्वाचार वाजता सुरू झालेली मोहीम पावणेसहा वाजता संपली. सलग आठ दिवसांच्या मेहनतीनंतर गर्डरचे काम फत्ते झाल्यामुळे हायवेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी सायंकाळी जल्लोष केला. पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
बाळे रेल्वे क्रॉसिंगजवळ ब्रिजची उंची ६.८ मीटर असून, त्या ठिकाणी साठ मीटर अर्थात दाेनशे फुटांच्या गर्डर स्पॅनचे काम पूर्ण झाले. गर्डरवर लवकरच सिमेंट क्राँक्रिटीकरणचे काम होईल. त्यानंतर, वीस ते पंचवीस दिवसांत हत्तूर ते केगाव हा २१ किलोमीटरचा बायपास रस्ता खुला हाेणार आहे. गर्डर लॉन्चिंगसाठी १२ तज्ज्ञ इंजिनीअर स्पॉटवर २४ तास तैनात आहेत. यासोबत २५ क्रेन ऑपरेटर, हेल्पर आणि सुपरवायझर स्पॉटवर ठाण मांडून होते. या सर्वांनी रविवारी सुटकेचा निश्वास टाकला. गर्डर लॉन्चिंगसाठी साडेतीनशे टनाच्या चार क्रेन हैदराबादहून मागविल्या आहेत. चारही क्रेन स्पॉटवर तैनात असून, या गर्डरचे ड्रोनद्वारे डिजिटल चित्रीकरण सुरू होते. इंदोर, हैदराबाद, तसेच मलेशियातील तज्ज्ञ इंजिनीअर या कामावर लक्ष ठेवून होते.
सोलापूर शहरातील जड वाहतूक कमी हाेण्याच्या दृष्टीने हत्तूर ते केगाव हा चार पदरी बायपास रस्ता महत्त्वाचा आहे. हा बायपास विजयपूर ते पुणे महामार्गाला थेट जोडतो. त्यामुळे दोन्ही महामार्गांवरून येणारी जड वाहतूक शहराच्या बाहेरून जाईल. त्यामुळे शहरावरील मोठा भार कमी होईल, तसेच अपघातही कमी होतील. यासाठी आता सोलापूरकरांना वीस ते पंचवीस दिवस वाट बघावी लागेल.
पुढील वीस ते पंचवीस दिवसांत हत्तूर ते केगाव बायपास रस्ता सुरू होईल. त्याची तयारी हायवेकडून सुरू झाली आहे. अथक परिश्रमानंतर दहा गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण झाले. रविवारी सर्व अधिकाऱ्यांनी, तसेच कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
- अनिल विपत, हायवे ऑपरेशन मॅनेजर
................................