सोलापूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. रविवारी रात्री पावणे सात वाजता होटगी विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून, सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारणाच्या तीन महामार्गांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
होटगी रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी रात्री त्यांचा मुक्काम असणार आहे. लोकार्पण सोहळ्यात सोलापूर अक्कलकोट, सोलापूर ते सांगली आणि सोलापूर ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच हत्तूर ते केगाव बायपास रस्त्याचे यावेळी उद्घाटन होईल. यासोबत मोहोळ आणि आडेगाव जंक्शन या अंडरपास असलेल्या दोन कि.मी. रस्त्याचे भूमिपूजनदेखील यावेळी होणार आहे. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, तसेच स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडे उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व सोहळ्यांची लोकार्पण आणि उद्घाटन डिजिटल स्क्रीनवर होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी दिली आहे. कार्यक्रमानंतर ते अक्कलकोटकडे रवाना होतील. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर तेथून अक्कलकोट येथील हेलीपॅडवरून गाणगापूरकडे रवाना होणार आहेत.