आप्पासाहेब पाटील
सोलापूर : प्रवाशांची सुरक्षितता व स्थानकावरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील १० प्रमुख स्थानकांवर अत्याधुनिक पद्धतीचे व्हिडिओ कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यात सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूरसह अन्य सात स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची घुसघाेरी, चोरी, दरोड्यांच्या घटना, रेल्वे ट्रॅक पडलेल्या व्यक्तींची माहिती व इतर गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी या व्हिडिओ कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे. हे कॅमेरे स्थानक परिसरात आलेल्या प्रत्येक व्यक्तींचे फोटो संकलित करेल. जे लोक आधीपासूनच रेल्वेच्या ब्लॅक लिस्टमध्ये आहेत, ते त्यात आढळून आल्यास संबंधित यंत्रणेच्या कक्षात अलार्म वाजणार आहे. त्यामुळे संशयित व पाहिजे असलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठीही या व्हिडिओ कॅमेऱ्याचा उपयोग होणार आहे. हा अलार्म संबंधित ऑपरेटर,रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, जवानांच्या मोबाईलवरही ते कळणार असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
-------
अत्याधुनिक कॅमेरे....
स्थानकावर लावण्यात येणारे कॅमेरे हे अत्याधुनिक स्वरूपाचे आहेत. यात चार प्रकारचे आयपी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. डोम प्रकार, बुलेट प्रकार, पॅन टिल्ट झूम प्रकार आणि अल्ट्रा एचडी फोर के याचा समावेश आहे. रेल्वे स्थानक व परिसरातील जास्तीत जास्त भाग कव्हरेज करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना याची अधिक मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सेलमधून मिळालेल्या व्हिडिओ फीडचे रेकॉर्डिंग ३० दिवसांसाठी साठवले जाऊ शकते. या व्हिडिओमधील चित्रीकरण सोलापूर मंडल ते मुंबई मुख्यालयापर्यंत दिसणार आहे.
------------
स्थानकावर दोन पॅनिक बटण...
स्थानकावर पैनिक बटन स्थानकावर ज्या व्यक्तींना मदत हवी आहे, असुरक्षित वाटत असेल किंवा काही महत्त्वाची माहिती द्यावयाची असेल, त्या प्रवाशाने स्थानकावर कार्यान्वित करण्यात आलेले दोन पॅनिक बटन चालू केल्यास संबंधित विभागाला तसा संदेश जाणार आहे. संदेश आल्यानंतर संबंधित विभागातील व्यक्ती व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मदतीने त्या व्यक्तींचे स्थान शोधेल. त्यानंतर तत्काळ संबंधित व्यक्तीला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून मदत मिळणार आहे.
--------
या स्थानकावर बसविण्यात येणार कॅमेरे
सुरक्षेच्या कारणास्तव मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड, गुलबर्गा, कोपरगांव, कुर्डूवाडी, पंढरपूर, लातूर, साईनगर शिर्डी, सोलापूर व वाडी या स्थानकावर व्हिडिओ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या संदर्भात रेल्वे सुरक्षा बलाकडून कुठे कॅमेरे बसवायचे याबाबत सर्वे सुरू असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाकडून सांगण्यात आले.