सोलापूर : बेकायदेशीर जमाव जमवून दहशत पसरवरुन कोणालाही मारपीट करायचा. आर्थिक फायद्यासाठी घातक शस्त्र दाखवून धमकावणे, बाईक चोऱ्या अशा गंभीर स्वरुपाचे १८ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले (वय- २५, रा. मराठा वस्ती, सोलापूर) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याची शनिवारी पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. शहरातील नागिरकांचे जनजीवन विस्कळीत करुन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे काम आरोपी आकाश वडितिले याच्याकडे होत होते.
गेल्या काही वर्षांपासून तो घातक शस्त्राचा धाक दाखवून मोटारयसाकल चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे तो करीत होता. त्याच्या गुन्हेगारी कारवायांबद्दल व्यापारी, सर्वसामान्य नागिरक उघडपणे पोलिसांना माहिती देण्यासही धजावत नव्हते. त्याच्या या कृत्याला लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या आदेशानुसार एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे अरविंद माने, विशेंद्रसिंग बायस यांच्यासह पथकातील अंमलदारांनी केली. तडीपार आदेशाचाही भंगआकाश उर्फ अंड्या वडितिले याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन २०१३ व २०१५ मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीची व २०२१ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. अखेर त्याची शनिवारी स्थानबद्ध कारवाई करुन त्याला येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले.