उपसा सिंचन योजनेला निधी मिळावा यासाठी शरद पवार यांची भेट घेणार आहोत. राज्यात आमचे सरकार नसले अन् मी अपक्ष असलो तरी प्रामाणिकपणे काम करीत आहे. जनतेच्या कामासाठी दहा हेलपाटे मारण्याची माझी तयारी आहे. आणि मंत्री देखील माझी तळमळ पाहून नक्कीच सहकार्य करतील याची मला खात्री आहे.
बार्शी तालुक्यातील १२ गावांतील पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचा मानस आहे. त्यासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात निधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. याअंतर्गत पांढरी तलावासाठी साडेआठ कोटी मंजूर झाले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी २५/१५ हेड अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये बार्शी तालुक्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन दिले आहे.
जामगाव (पा.) येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राचे काम लवकरच सुरू होईल, तसेच ग्रामपंचायतीने त्यांच्या गायरानाच्या जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी सौरऊर्जाअंतर्गत विद्युत केंद्रे उभारली जाणार आहेत.
तालुक्यातील विद्युत उपकेंद्र क्षमता वाढविण्याबाबतही प्रस्ताव ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे दिले आहेत. पांढरी येथील पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. घोर ओढ्याचे सरळीकरण करून या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात बंधारे बांधून पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर आपला भर असणार आहे.
बार्शी उपसा सिंचन योजनेंतर्गत
जामगाव येथे भूसंपादनासाठी आठ कोटी पन्नास लाख रुपये व उपळाई येथे चार कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तसेच ढाळे पिंपळगावजवळील साकत येथे कॅनाॅलच्या कामासाठी एक कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील अर्थकारण वाढविण्यासाठी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आपण केली आहे. यासाठी पालिकेने पाणी देण्याची तयारी दाखविली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विविध रस्त्यांसाठी आजपर्यंत १३ कोटी रुपये आणले आहेत.
बार्शी शहरात नगरपालिकेच्या वतीने सध्या दमदार कामे सुरू आहेत. विरोधकांनी विकास कामांना विरोध करू नये असे सांगून शहरासाठी तीन कोटी रुपयांच्या कामाच्या वर्कऑर्डर झालेल्या आहेत, असे राऊत यांनी सांगितले. पुढील वर्षी ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे. वीज पाणी व उद्योग या गोष्टी असणाराच तालुका मजबूत असू शकतो.
अतिवृष्टीने बार्शी तालुक्यातील नद्यांवरील वाहून गेलेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, तोही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
नागझरी भोगावती नदीसारखे घोर ओढ्यावरही मोठे बंधारे बांधले जाणार आहेत. रखडलेली बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी व या योजनेला जादा निधी मिळविण्यासाठी लवकरच शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे आमदार राऊत यांनी यावेळी सांगितले.
----