संताजी शिंदे सोलापूर : एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ करीत असताना दुसरीकडे त्याच बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करून तो रुजवण्याचा प्रयत्न न्यू बुधवार पेठ येथे करण्यात आला. समाजातील लोकांकडून वर्गणीच्या माध्यमातून पैसा गोळा करून बौद्धांचा दानमय बुद्धविहार रमापती चौकात उभारण्यात आला.
पूर्वी बागले वस्तीनंतर आंबेडकर नगर नावाने ओळखला जाणारा भाग आज न्यू बुधवार पेठ म्हणून परिचित आहे. न्यू बुधवार पेठमध्ये एकूण १४ चौक आहेत, प्रत्येक चौकात एक बुद्ध विहार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये शिक्षण आणि धम्म या दोन गोष्टींवर जास्त भर दिला होता. बाबासाहेबांचा हा विचार अंगीकारून न्यू बुधवार पेठ येथे शिक्षणाबरोबर धम्म चळवळ मोठ्या जोमाने सुरू झाली होती. जनार्दन शिंदे, एस.आर. गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, राजा कदम, अंबादास घोडकुंबे, चंद्रकांत कोळेकर, मुकुंद कांबळे, बाबू बनसोडे आदींनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले होते. दरम्यान, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि बी.सी. कांबळे या दोन गटांमध्ये चळवळ विभागली गेली होती.
दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया ९00 विद्यार्थ्यांनी रिपब्लिकन युवक ऐक्य आंदोलन समितीची स्थापना केली होती. सोलापुरात त्याकाळी दादासाहेब गायकवाड गट व बी.सी. कांबळे गटाच्या दोन मिरवणुका निघत होत्या. ऐक्य आंदोलन समितीमधील बाबू सितासावंत, महादेव लोंढे, कामगार नेते अशोक जानराव, भालचंद्र गवळी, वसंत भालशंकर, जनार्दन शिंदे, प्रकाश शिवशरण आदींनी सक्रिय सहभाग घेऊन त्याकाळी निघणाºया दोन मिरवणुका एकत्र आणल्या. १९७८-७९ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आली, ती आजतागायत कायम आहे.
समाजासाठी बुद्धविहार असावा असा विचार पुढे आला. बुद्ध शासन सभा आणि भारतीय बौद्ध महासभा अशा दोन संघटनांच्या माध्यमातून काम चालत होते. बुद्ध विहारासाठी न्यू बुधवार पेठ येथील पक्ष, गट आणि संघटना बाजूला ठेवून सर्व समाज एकत्र आला. १९७४ साली विहाराच्या कामाला सुरुवात झाली, १९७३ साली समिती स्थापन झाली. पहिले अध्यक्ष बी.नी. माने होते. विहार उभारण्यात एस.व्ही. शिवशरण, हिराबाई विटेकर, विठाबाई शिवशरण, प्रल्हाद चंदनशिवे, बाबू चौधरी, देविदास चंद्रमोरे गुरुजी, पी.एच. भालेदार, शि.गु. सोनकांबळे, विठ्ठल कांबळे, बसप्पा कांबळे, ए.टी. दावणे, हिराप्पा इंगळे, मच्छिंद्र सोनवणे, नवनाथ वाघमारे, प्रल्हाद कांबळे, लोकाप्पा दोड्यानूर आदींचा समावेश होता. महास्थवीर यू नंदिया यांनी ब्रह्मदेशातून पंचधातूची मूर्ती मागवली होती. महास्थवीर यू नंदिया व भन्ते शिलरत्न यांच्यामुळे प्रत्येक घरात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला.
भव्य डॉ. आंबेडकर उद्यान उभे राहिले...
- - १९९२-९७ मध्ये तत्कालीन नगरसेवक अशोक जानराव होते, त्यांनी चंडक पॉलिटेक्निक शेजारी असलेल्या जागेत डॉ. आंबेडकर उद्यानाची संकल्पना मांडली व त्यासाठी प्रयत्न केले. उद्यानासाठी ४२ दिवसांचे आंदोलन केले आणि २000 मध्ये दोन एकरात भव्य उद्यान उभे राहिले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेल्या उद्यानामुळे या भागातील सौंदर्यात भर पडली आहे.
न्यू बुधवार पेठेतील १४ चौक...
- - न्यू बुधवार पेठ येथे सुभेदार रामजी चौक, राहुल चौक, आनंद चौक, दोस्ताना चौक, संत गल्ली, भीमरत्न चौक, सम्राट अशोक चौक, रमापती चौक, महात्मा फुले चौक, भीम-विजय चौक, वीर फकिरा चौक, मुकुंद चौक, बजरंग चौक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौक असे १४ चौक आहेत.