सोलापूर : जोपर्यंत आपले कुटुंब सुरक्षित नाही तोवर आपण आपल्या कामावर लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या कुटुंबांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कामात गतिशीलता येण्यासाठी २ आॅक्टोबरपासून प्रत्येक ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक हजेरी बसविण्याची सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या.
सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. भारुड यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जी कुटुंबे पायाभूत सर्वेक्षणापासून दूर राहिली आहेत, अशा कुटुंबांचा तत्काळ यादीत समावेश करावा. समाजकल्याण, दिव्यांग योजनांची अंमलबजावणी, वनराई बंधारे बांधण्याबाबत पुढाकार घ्यावा. गटारमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. प्रारंभी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी रोजगार हमीतून विहिरी व वैयक्तिक स्वच्छतेची कामे घेण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या. यासाठी जॉबकार्ड व रोजनिशी निगडीत सर्व कागदपत्रांची वेळेत पूर्तता करण्याचे आवाहन केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी मागासवर्गीय वस्ती विकास आराखड्यासंदर्भात विविध विकासकामांची माहिती दिली. वंचित घटकांपर्यंत विविध योजना पोहोचविण्याची सरपंच आणि ग्रामसेवकांची जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली. लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी ग्रामपंचायतीने वनराई बंधाºयाद्वारे पाणी अडविण्याचे उपक्रम घेतल्यास शेतकºयांना फायदा होणार आहे. श्रमदानातून असे बंधारे बांधण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन केले. ह.भ.प. धीरज शर्मा यांनी व्यसनाधीनतेवर मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे उपस्थित होते.