सांगोला : लाॅकडाऊनच्या कालावधीत शासकीय अधिकारी, कर्मचारी आपआपल्या कर्तव्यात व्यस्त असताना गोपनीय खबरीच्या आधारे वन कर्मचाऱ्यांनी संशयित दोघांना ताब्यात घेऊन घटनास्थळावरून मृत २ मोर, ६ लांडोरसह २ तितर पक्षी, ५० ग्रॅम मका बियाणे, विळा, पक्षी पकडण्याचे जाळे , दुचाकी असे साहित्य हस्तगत केले. ही घटना बुधवार २० रोजी दु. २ च्या सुमारास सांगोला येथील बनकर मळा याठिकाणी उघडकीस आली आहे.
दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी संशयित दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.वनपरिक्षेत्र कार्यालय वनपाल एस जे शिंदे व वनरक्षक डी. एस देवकरसह इतर कर्मचाऱ्यांनी गोपनीय खबरीच्या आधारे बुधवार २० रोजी दु. २ च्या सुमारास सांगोला ( बनकर मळा ) येथे समक्ष जागेवर जाऊन चौकशी व शोध घेतला असता २ मोर , ६ लांडोर, २ तितर मृतावस्थेत आढळून आले. सदर क्षेत्रावर पायाच्या साह्याने रेष ओढून त्यावरती मक्याचे बी पडलेले आढळून आले .सदर ठिकाणी कर्मचारी पाहणी करीत असताना अशोक आप्पा चव्हाण व तानाजी शिवा चव्हाण (रा. संजय नगर झोपडपट्टी , सांगोला) यांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून पक्षी पकडण्यासाठी तीन जाळे , एक विळा, ५० ग्राम. मका बियाणे व एमएच १३ डब्ल्यू ४४५३ एक दुचाकी हस्तगत केली. सदरचा गुन्हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलमान्वये नोंद करण्यात आला तसेच मृत मोर व लांडोर पक्षाना वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांचेकडून शवविच्छेदन करून घेतले. सदर गुन्ह्याची चौकशी उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार २१ रोजी सहा. वनसंरक्षक आर .एन .नागटिळक व वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.डी. बाठे यांनी कर्मचारी समवेत ( बनकर मळा ) सांगोला येथे जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून स्थानिक स्थळाचा पंचनामा केला. सदर आरोपीचे जाब, जबाब नोंद करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही डी बाठे करीत आहेत.