सोलापूर : महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील मकाऊ, गोल्डन फिजीएंट, मस्कली, पोपट, कबुतरे असे जवळपास चाळीस ते पन्नास लहान-मोठे पक्षी वनविभागाच्या सिद्धेश्वर वनविहार येथे स्थलांतरीत करण्यात आले़ नियम, अटींमध्ये अनियमितता असल्याचे कारण दाखवित केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सोलापूरच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने पुनश्च मान्यता मिळण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आला. प्राधिकरणाने काही त्रुटी दाखवत येथील पक्षी इतरत्र स्थलांतर करण्याची सूचना केली़ त्यामुळे येथील सर्व पक्षी सिद्धेश्वर वनविहार येथे हलविण्यात आले.
दरम्यान, प्राणिसंग्रहालयातील काळजीवाहक कर्मचाºयांकडून दररोज खाद्य, स्वच्छतेसह इतर वैद्यकीय तपासणी अशी सर्व देखभाल करण्यात येत आहे़ जवळपास चाळीस ते पन्नास पक्षी असून प्राधिकरणाकडून पुढील सूचना येईपर्यंत हे पक्षी सिद्धेश्वर वनविहारातच मुक्कामी असणार आहेत़ केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता २८ नोव्हेंबर २०१८ रोजी रद्द करण्यात आली. आॅक्टोबर २०१७ मध्ये प्राधिकरणाकडून झालेल्या पाहणी करून अनेक त्रुटी दाखवून देण्यात आल्या.
प्राणिसंग्रहालय प्रशासंनाकडून काही त्रुटी दूर करुन २२ मे २०१८ रोजी प्राधिकरणाकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यावर प्राधिकरणाचे समाधान झाले नाही. त्यामुळे २८ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्यात आली. डिसेंबर २०१८ मध्ये मान्यता पुनश्च मिळावी यासाठी प्राधिकरणाकडे अपिल करण्यात आले. ११ मार्च २०१९ ला त्याची सुनावणी होऊन सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. जुलै २०१९ मध्ये प्राधिकरणाने मान्यता देण्यासाठी पुन्हा सर्व त्रुटीची पूर्तता पाहणी करण्यासाठी येणार आहे, असे पत्र दिले. त्यांनी दिलेल्या निधीचा पिंजरे बांधणीकरिता वापर करून त्यात प्राणी स्थलांतरित करण्यात आले. प्राणिसंग्रहालयात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या त्यामध्ये हरणांचे निबीर्जीकरण, प्राणिसंग्रहालयाच्या चारी बाजूने संरक्षक भिंत इ. असून डिसेंबरमध्ये पुनश्च मान्यता मिळण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे, असे संचालक डॉ. नितीन गोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले .
प्राणिसंग्रहालय कात टाकतेय - प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत त्यांनी दिलेल्या निधीचा वापर करीत प्राणिसंग्रहालयात अनेक बदल करण्यात आले आहेत़ मगरींचे विस्तीर्ण अशा पिंजºयात स्थलांतर करण्यात आले. नव्याने बांधण्यात आलेल्या उघड्या, खंदक पिंजºयातून वाघ आणि सिंह यांना सहज पाहता येणार आहे. सिंह आणि वाघ लवकरच येणे अपेक्षित आहे़ गुजरातच्या जुनागड येथील शक्करबाग प्राणिसंग्रहालयातून सिंह आणि औरंगाबाद येथून वाघाची मागणी केली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे प्राणिसंग्रहालय परिसर हिरवागार झाला आहे. येथील प्रशासनाकडून स्वच्छतेसह योग्य निगा राखली जात असल्याने परिसर निसर्गरम्य दिसत आहे. आणखी काही भाग विकसित करणे आवश्यक असल्याचेही प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.