पोलिसांनी संशयित आरोपी चंदाबाई कुबेर नरळे (वय ५५) हिला अटक केली आहे. मंगळवेढा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अकोला रोडवर फिर्यादी चंदाबाई कुबेर नरळे व त्यांची मयत मुलगी मंगल नरळे या दोघी राहतात. त्या नेहमीप्रमाणे घराच्या गच्चीवर झोपल्या होत्या. दरम्यान बुधवारी मध्यरात्री आई चंदाबाई हिने मुलगी झोपेत असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची पोलिसांना कबुली दिली.
प्रारंभी या घटनेची फिर्याद स्वतः आई चंदाबाई हिनेच पोलिसांत दिली होती. त्यामध्ये तिने आपण गच्चीवर झोपलो होतो. रात्री ११ वाजता अचानक पोटात कळ मारू लागल्याने त्या खाली शौचास आल्या. मुलगी मंगल गच्चीवर एकटी झोपली होती. तेव्हा आई शौचालयात असताना त्यांना कशाचा तरी आवाज आल्याने त्या गच्चीवर गेल्या. त्यावेळी मुलगी मंगल हिचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्याचे निदर्शनास आले, असे फिर्यादीत म्हटले होते.
याबाबत पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सखोल चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्या बोलू लागल्या. दरम्यान संशयित आरोपीने खुनाची स्वतः कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. केवळ १० तासात खुनाचा उलगडा करण्यात मंगळवेढा पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या टीमला यश आले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व सपोनि भगवान बुरसे यांनी संशयित आरोपीला जेरबंद केले.
---
या खून प्रकरणी फिर्यादीच आरोपी निघाली आहे. आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. केवळ १० तासात आरोपीला गजाआड करण्यात मंगळवेढा पोलिसांच्या टीमला यश आले आहे. हा खून कोणत्या कारणाने झाला आहे, हे पोलीस तपासात निष्पन्न होईल.
- ज्योतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक, मंगळवेढा