सोलापूर : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकेच्या परिवहन समितीने नव्या १०० बस घेण्यास पुढाकार घेतला असला तरी सत्ताधारी भाजपाने या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. परिवहन उपक्रम (एसएमटी)ला प्रथम फायद्यात आणा, त्यानंतर नव्या बस खरेदीचा निर्णय घेऊ, असेही या पदाधिकाºयांनी सुनावले आहे.
डबघाईला आलेल्या एसएमटीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के आणि व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी नव्या १०० बस घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे. नव्या बस खरेदीसाठी २५ कोटी रुपये लागतील. एसएमटी आर्थिक संकटात असली तरी २५ कोटींचे कर्ज घेण्यात येईल. या कर्जाला महापालिका आयुक्तांनी हमी देण्याची तयारी दाखविल्याचा दावाही एसएमटीचे व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी केला आहे, परंतु महापालिकेचे पदाधिकारी नव्या बस खरेदीच्या विरोधात आहेत. शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी मात्र ही बस खरेदी स्मार्ट सिटीतून होणार असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान सभागृहनेते संजय कोळी म्हणाले,गाड्या खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी जेथे बस आवश्यक आहेत अशा मार्गांचा अभ्यास करुन अहवाल द्यायला हवा. मागील काळात आवश्यकतेपेक्षा जादा गाड्या घेण्यात आल्या. त्याचा खर्च वाढला. ही चूक पुन्हा होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. सध्या सर्व गाड्या रस्त्यावर धावल्या पाहिजेत. त्यातून परिवहन फायद्यात आले तरच नव्या गाड्या घेण्यात अर्थ आहे.
कर्ज काढून बस घेणे तोट्याचे : महापौर- केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील काही शहरांमध्ये प्र्रत्येकी १० इलेक्ट्रॉनिक बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. डिझेलच्या बसमुळे मोठे प्रदूषण होते. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळे सोलापूरलाही १० इलेक्ट्रॉनिक बस देण्यात याव्यात, अशी मागणी आम्ही गडकरींकडे करणार आहोत. महापालिकेवर आर्थिक संकट आहे. त्यात कर्ज काढून नव्या बस घेणे आणखी तोट्याचे ठरेल. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक बसला प्राधान्य दिलेले बरे, असे महापौर शोभा म्हणाले.
स्मार्ट सिटी योजनेतून नव्या ५० इलेक्ट्रॉनिक बस खरेदीचा प्रस्ताव आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. पदाधिकाºयांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परिवहन समिती १०० बस म्हणत असली तरी प्रत्यक्षात ५० बस खरेदी करण्यात येणार आहेत. - महेश कोठे, विरोधी पक्षनेते.