भाजप सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचारात वाढ, सुशिलकुमार शिंदे यांची भाजप सरकारवर टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:42 PM2018-04-10T14:42:09+5:302018-04-10T14:42:09+5:30
सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे चार हुतात्मा पुतळ्याजवळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले.
सोलापूर : भाजप सरकार केंद्र व राज्यात आल्यापासून जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकाचा आवाज दाबला जात आहे व त्यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. जातीय हिंसाचाराला भाजप सरकारचा छुपा पाठिंबा आहे. भारताची वाटचाल लोकशाहीवरून हुकूमशाहीकडे सुरू आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी येथे बोलताना केली.
सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे चार हुतात्मा पुतळ्याजवळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार भारत भालके, आमदार रामहरी रुपनर, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, दिलीप माने, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी खासदार धर्मण्णा सादूल, राजशेखर शिवदारे, दत्ता सुरवसे, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, महिला जिल्हा अध्यक्ष इंदुमती अलगोंडा पाटील, शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर,चंद्रकांत दायमा, पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, लोकसभा युवक अध्यक्ष सुदीप चाकोते, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, नगरसेवक चेतन नरोटे, नरसिंग कोळी, बाबा मिस्त्री, तौफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, अनुराधा काटकर, फिरदोस पटेल, परवीन इनामदार, माजी महापौर सुशीला आबुटे, अलका राठोड, नलिनी चंदेले, शिवाजी काळुंगे, गौरव खरात, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, भीमाशंकर जमादार, लक्ष्मण भोसले, संजय हेमगड्डी, अशफाक, बळोरगी, केदार उंबरजे, अशोक कलशेट्टी, सिद्धाराम चाकोते आदी सहभागी झाले होते. स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास व देशासाठी बलिदान दिलेल्या चार हुतात्म्यांना अभिवादन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे.देशात सामाजिक सलोखा, शांतता, बंधुत्व नांदावे या यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे त्यासाठीच आज देशभर अशाप्रकारे उपोषण करण्यात येत आहे. उपोषण ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, सिद्धेश्वर देवस्थानचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. उपोषणात शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सहकारमंत्र्यांची भेट
काँग्रेसचे भाजप सरकारविरोधात उपोषण सुरू असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पार्क स्टेडियममध्ये एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यांचा ताफा पाहून काँग्रेस कार्यकर्ते उभे राहिले. त्यावेळी ते कार्यक्रमस्थळाकडे जाऊ लागल्यावर कार्यकर्त्यांनी आम्हाला तुम्ही आमच्याकडेच आलात का असे वाटले अशी प्रतिक्रिया देशमुख यांना दिली. थांबा हा कार्यक्रम करून तुमच्याकडेही येतो असे म्हणून ते कार्यक्रमाकडे गेले. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी उपोषणाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावर सहकारमंत्री देशमुख यांनी तुमच्या भावना शासनाकडे कळवितो असे आश्वासन दिले. यानंतर सहकारमंत्री देशमुख यांच्या या अनपेक्षित भेटीची चर्चा सर्वत्र रंगली.