‘लोकमत’ चे दोन्हीही वृत्त ठरले अचूक
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार, हे आठ दिवसांपूर्वीच प्रसिध्द केलेले ‘लोकमत’ चे वृत्त अखेर खरे ठरले़ फलटणच्या रणजितदादांना उमेदवारी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे याच्या महाआघाडीला पूर्णपणे सुरूंग लावला आहे.
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे सुपुत्र असलेले रणजितसिंह अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. फलटण तालुक्यात रामराजे नाईक-निंबाळकरांचे कट्टर विरोधक म्हणून काम करताना रणजितदादांनी सातारा जिल्ह्यात स्वत:ची स्वतंत्र आघाडी बनविली़ या आघाडीला आजपावेतो खासदार उदयनराजे भोसले अन माण -खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची साथ लाभली़ रणजितदादा हे अनेक वर्षे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जात़. फलटण तालुक्यात रणजितदादांचा स्वत:चा साखर कारखाना तसेच दुध प्रकल्प आहे.
माढ्यात शरद पवार यांच्या माघारीनंतर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बदलती समीकरणे ओळखून राष्ट्रवादीने भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना पक्षाची उमेदवारी दिली़ त्यानंतर भाजपनेही आपले धोरण तत्काळ बदलले़ संजयमामांच्या महाआघाडीतील फलटणच्या निंबाळकरांना भाजपमध्ये प्रवेश देऊन दोन मित्रांना समोरासमोर मैदानात आणले.
जेव्हा अकलूजमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील भाजप प्रवेशाचा निर्णय घेत होते, त्यावेळी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे हेच अधिकृत उमेदवार असणार, असे स्पष्टपणे ‘लोकमत’ ने सांगितले होते़ त्यानंतर संजयमामा बारामतीत राष्ट्रवादीत प्रवेश करीत असताना त्यांच्या विरोधात भाजपकडून त्यांचेच मित्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर असतील, हेही राजकीय गुपित ‘लोकमत’ ने उलगडले होते़ ‘लोकमत’ च्या दोन्हीही बातम्या अचूक ठरल्याबद्दल शुक्रवारी अनेक वाचकांनी कार्यालयात दुरध्वनी करून आपल्या भावना व्यक्त केल्या.