विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १२ लाख ८८ हजार १४९ रुपये आहे. त्यांच्याकडे ४७ लाख ९३ हजार ११ रुपये तर पत्नी प्रणिता यांच्याकडे ३१ लाख १ हजार ९३९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. १ कोटी ४० लाख ८४ हजार ५०० रुपये तर पत्नी प्रणिता यांच्याकडे ५६ लाख ११ हजार ६६६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. भगीरथ यांच्याकडे १५.८२ तोळे व प्रणिता यांच्याकडे ३२ तोळे सोने आहे. त्याचबरोबर भगीरथ भालके यांच्याकडे ७३ लाख ९८ हजार ६४३ रुपयांचे कर्ज आहे.
भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे एकूण वार्षिक उत्पन्न ५ कोटी ६८ लाख ७० हजार ५२० रुपये आहे. त्यांच्याकडे ६४ कोटी ९६ लाख १० हजार ३६० रुपये जंगम व ४ कोटी ८८ लाख ७८ हजार ७१ रुपये स्थावर मालमत्ता आहे, तर पत्नी अंजली यांच्याकडे १ कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. समाधान यांच्याकडे ९ तोळे व पत्नी अंजली यांच्याकडे ४२ तोळे सोने आहे, तर समाधान आवताडे यांच्याकडे १७ कोटी ७ लाख ९३ हजार ५४२ रुपये कर्ज आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे - पाटील यांच्याकडे ३ लाख ७६ हजार ५३३ रुपये जंगम मालमत्ता, ३६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता व त्यांच्या पत्नीच्या नावे ४ लाख ९ हजार रुपये जंगम मालमत्ता व २५ लाख रुपये स्थावर मालमत्ता आहे, तर सचिन शिंदे यांच्याकडे ७१ लाख ३३ हजार ५३४ रुपये कर्ज आहे.
अपक्ष उमेदवार नागेश भोसले यांचे वार्षिक उत्पन्न १६ लाख २३ हजार ४७० रुपये आहे. त्यांच्याकडे ४५ लाख रुपये जंगम मालमत्ता, ४ कोटी २७ लाख रुपये ५ हजार ७७१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर पत्नी साधना यांच्याकडे ४ लाख ९ हजार रुपये जंगम मालमत्ता आहे. त्याचबराेबर भोसले यांच्याकडे १०० तोळे सोने आहे. त्यांच्याकडे ६ कोटी ५८ लाख ९३ हजार ७६४ रुपये कर्ज आहे. अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी, २८ लाख २९ हजार ६९८ रुपये आहे. त्यांच्याकडे १ कोटी, ३० लाख ९८ हजार २५० रुपये तर पती धनंजय यांच्याकडे ४० लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्याचबराबेर त्यांच्याकडे १३ लाख ७९ हजार ४६२ रुपये कर्ज आहे.
दोघांकडे पिस्तूल
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याकडेच शासनाकडून वापर परवाना मिळालेले पिस्तूल आहे.