मुंबई - भाजपकडून सोलापूरच्यालोकसभा रणांगणात उभारलेल्या गौडगावच्या जयसिद्धेश्वर महाराजांनी आयुष्यात प्रथमच मतदान केलं आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुका त्यांनी जवळून पाहिल्या. या निवडणुकांसाठी त्यांचे अनुयायी उमेदवार राहिले, निवडूणही आले, पण स्वामींनी कधीही त्यांना मतदान केलं नाही. मात्र, यंदा प्रथमच स्वत: उमेदवार असल्याने स्वामींनी मतदान केलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी गावोगावी फिरताहेत. ज्या स्वामी महाराजांच्या चरणी दूरदुरुन लोक येत ते स्वामी महाराजा निवडणूक प्रचाराच्या काळाता गाव-खेड्यात जाताना दिसून आले. तर, जात-धर्म पंथ या पलिकडे जाऊन स्वामींनी मतदानसाठी मतदारांना आवाहन केलं. नेहमी भगवी वस्त्र परिधान करणाऱ्या जयसिद्धेश्वर महाराज यांचं स्वागत करण्यासाठी काळा बुरखा घातलेल्या काही भगिनी भाजपच्या मंडपात उभारल्याचंही चित्र यंदा पाहायला मिळालं. भगव्या वस्त्रातले महाराज गळ्यात हार घालून त्यांच्यासमोर विनम्रपणे उभे होते. तर दोघीजणी हातात पंचारतीचं ताट घेऊन त्यांना ओवाळत. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवारही साक्षीला उभे होते.
जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. या महाराजांनी आजपर्यंत कधीच मतदान केलं नव्हतं. यंदा सर्वांना मतदानाचा हक्क बजावा, असे सांगणाऱ्या महाराजांनी कित्येक उन्हाळे-पावसाळे पाहिले. पण, यंदा प्रथमच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जय सिद्धेश्वर स्वामींचा शिष्यवर्ग मोठा आहे. त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. अक्कलकोट तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षात त्यांचे भक्त आणि अनुयायी आहेत. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर ते दिसत. बहुतांश कामाचे भूमिपूजनही त्यांच्याच हस्ते व्हायचे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकांच्या आखाड्यातही त्यांचे भक्तच उमेदवार असतात. त्यामुळे मतदान कोणाला करावे? असा प्रश्न स्वामींना पडत. जर आपण एका भक्ताला मतदान केलं, तर दुसरा भक्त नाराज होईल. कोणत्या एका नेत्याला मत दिलं तर ते त्या नेत्याला जरी माहित नसलं तरी परमेश्वर पाहणार. म्हणून महास्वामींनी कधीही मतदानाचा हक्क बजावला नाही. मात्र, यंदा ते स्वत:च उमेदवार असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पण, आज त्यांनी मौन व्रत बाळगल्यामुळे काहीही बोलण्यास नकार दिला.
कोण आहेत महाराजजयसिद्धेश्वर यांचा राजकारणाशी काडीमात्रही संबंध नसून ते अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख आहेत. आयुष्यभर अंगावर भगवी वस्त्रे नेसून या स्वामींनी संत साहित्य अन् धर्म प्रवचन हेच कार्य अंगिकारले होते. त्यांनी धर्मशास्त्रात पीएचडी केली असून कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यासह अनेक भाषा त्यांना अवगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2014 साली भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात होता; त्यावेळीही यांच्या नावाची कुजबूज सुरू झाली होती. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे जातीची वैध प्रमाणपत्रे सविस्तर नसल्याने त्यांचे नाव मागे पडले. अन् त्यांनीही त्यावेळी राजकारणात उतरण्याबाबतची ठाम भूमिका घेतली नव्हती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून जयसिद्धेश्वर यांचे नाव जोरात चर्चिले जात होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जयसिद्धेश्वर यांच्यासाठी जोर लावला होता. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशीही चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी जयसिद्धेश्वर यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले.