आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा कडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता मागील अनेक दिवसापासून होती अनेक नावे चर्चेत येत होती. अखेर भाजपने सोलापूर लोकसभेसाठी माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता सोलापुरातून दोन विद्यमान युवा आमदारांमध्ये लढत होणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून भाजपाकडून अनेक नेत्यांची नावे समोर येत होती. विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, अमर साबळे, शरद बनसोडे, मिलिंद कांबळे, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, दिलीप कांबळे यांची नावे चर्चेत होती. मात्र भाजपच्या आमदारांमध्ये कोणत्याही एका नावावर एकमत होत नव्हते. अखेर पक्ष नेतृत्वाने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते या दोन युवा आमदारांमध्ये सोलापूर लोकसभेसाठी आता लढत होणार आहे.