कुर्डूवाडी: माढा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन नायब तहसीलदार विजय लोकरे यांना देण्यात आले.
राज्यामध्ये महाआघाडी सरकारच्या काळात येथील कायदा व सुव्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. धनंजय मुंडे प्रकरण असो की नुकतेच झालेले पूजा चव्हाण प्रकरण असो... या मध्ये गृहखात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. महाविकास आघाडी ही सरकार चालवण्यासाठी अपयशी ठरलेली आहे. महाआघाडी सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे घडत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या गृह खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष योगेश बोबडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमेश पाटील, ओबीसी मोर्चाचे बाळासाहेब ढगे, मदन मुंगळे, सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील, माढा तालुका युवा सरचिटणीस गिरीश तांबे, संग्राम देशमुख, सुहास देशमुख, विनायक लोंढे, भरत मस्के, बालाजी गायकवाड, सुहास सरडे, मुकुल वाघ, अमित करंजकर, ऋषिकेश सातारकर उपस्थित होते.
...............
२१ कुर्डूवाडी तहसील
नायब तहसीलदार विजय लोकरे यांना लेखी निवेदन सादर करीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करताना भाजपाचे तालुका पदाधिकारी.