पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडीला सरकारला डोकेच नाही. त्यांचे डोके ठिकाणे आणायची संधी आली आहे. कॉपी करणाऱ्याकडे दुर्लक्ष करा, या पोटनिवडणुकीनंतर भाजपाचे सरकार येणार आहे अशी भविष्यवाणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली.
रांझणी (ता. पंढरपूर) येथे भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे बोलत होते. यावेळी आ. प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत हेगडे, रिपाइंचे सुनिल सर्वगोड, वसंत देशमुख, दिपक भोसले, माऊली हळणवर यांच्या इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री बाळा भेगडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ५० हजार रुपये देतो, म्हणणारे कुठे गेले. सर्वात अधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यासर्व परिस्थितीला महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार आहे. त्यांचे मंत्री राजनामी देत आहेत. हे फक्त खाणारे सरकार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पुढील काही दिवसात महराष्ट्रातील सरकार बदलणार असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले.
आ. परिचारक म्हणाले, राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला द्यायचे म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना यावे लागते. विठ्ठलचा संचालकच म्हणतो विठ्ठल कारखान्याच्या निवडीत घोडा बाजार झाला आहे, असल्या राजकारणाची किळस वाटत असे परिचारक म्हणाले.
गंध पावडर करुन सांगोल्यांचे पाहुणे पंढरपुरला...सांगोल्यातील पाहुणे पंढरपुुरला हातात गजरे बांधणारे, गंध पावडर करुन आले होते. त्यांनी सांगोल्यांच्या कारखान्याची वाट लावली. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा दिला नाही. तो पैसा टेभुर्णी ते चौफुल्यापर्यंत उधळला. सोनके (ता. पंढरपूर) येथील तळात मुक्काम करुन आमदारकी मिळवली अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी नाव न घेता माजी आमदार दिपक साळुंखे यांच्यावर केली.