नरखेड : सध्याच्या सरकारने राज्यातील व देशातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांचा वापर करुन घेतला. परंतु अद्यापपर्यंत आश्वासनाशिवाय काही करता आले नाही. तीन वर्षांचा काळ लोटला तरी त्यांना ना नोकरी मिळाली ना रोजगार, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री, खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली.
नरखेड येथे जि. प. सदस्य उमेश पाटील यांच्या सन्मानार्थ उमेश पाटील मित्रमंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय नोकरी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, बळीराम साठे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जि. प. सदस्य उमेश पाटील, राजूबापू पाटील, अजिंक्यराणा पाटील, संतोष पवार, रमेश बारसकर, अंकुश चव्हाण, देवानंद गुंड-पाटील, विक्रांत माने, आप्पाराव कोरे, लतिफ तांबोळी, स्वप्निल सावंत, मंदा काळे, रेखा राऊत, शंकर साळुंखे, रुपाली दाभाडे, रत्नमाला पोतदार, नागेश अक्कलकोटे, जयदीप साठे, निरंजन भूमकर, हणमंत पोटरे, चंद्रहार चव्हाण, यशोदा कांबळे आदी उपस्थित होते.
तरुणांमध्ये निरुत्साह : भारुड- तरुण वर्गाच्या निरुत्साहीपणामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आपल्याकडील लोक गाव सोडून जिल्हा, राज्य, परराज्यांमध्ये जाऊ शकत नाहीत. मात्र परराज्यांतील बेरोजगार कुठेही जाऊन काम करण्यास तयार असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती, अथक परिश्रम घेतल्यास यशस्वी होऊ शकता, असे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितले. यावेळी जगन्नाथ कोल्हाळ, विनय पाटील, विजयकुमार पाटील, गोविंद पाटील, विजय पोतदार, प्रदीप पाटील, आप्पासोा राऊत, बालाजी साठे, हर्षवर्धन ढवण, दिलीप धावणे, ब्रह्मदेव फंड, राजकुमार पाटील, पंढरीनाथ मोटे, तात्या गोडसे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उमेश पाटील यांनी केले.
तरुणांना नोकरी देण्याच्या भूलथापा मारुन सत्तेवर आलेल्या या सरकारला बेरोजगार तरुणांचे काहीच सोयर-सुतक नाही. नोकरी देण्याच्या नावाखाली सरकारने त्यांना पकोडे तळायला लावल्याचे पाप केले. सध्याच्या काळात नोकरी मिळत नसल्याने तरुणांना छोकरी मिळणेही खूपच कठीण झाले आहे.- चित्रा वाघ,प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला आघाडी
१,२७0 जणांना नियुक्तीपत्र- नरखेड येथील या जिल्हास्तरीय नोकरी महोत्सवात आठ ते दहा हजारांच्या आसपास सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींनी उपस्थिती लावली होती. ४० नॅशनल व मल्टिनॅशनल कंपन्यांनी सहभागी होऊन १ हजार २७० जणांना नियुक्तीपत्र दिले, तर ६३० जणांना कामावर रुजू होण्याबाबत सूचना दिल्या. बारामती येथील भारत फोर्स कंपनीत २३५ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी जॉब कार्डचे प्रकाशन करण्यात आले.