सोलापूर : नरेंद्र आणि देवेंद्र हे देशातील फसवणुकीचे केंद्र झाले आहे. नोकरी गेली, जगणे मुश्कील झाले, नोकरी द्या, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या, अशा घोषणा देत राष्टÑवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर युवा आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाºयांनी गळ्याला प्रतीकात्मक फास लावून सरकारचा निषेध नोंदविला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पूनम गेटसमोर जमले. रोजगार न देणाºया सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी हातात फलक घेतले होते. ‘बुलेट ट्रेनच्या आधी बेरोजगारी रुळावर’, ‘बेकारीची शिडी विक्रमी पुतळ्यापेक्षा उंच, महाराष्ट्रात दीड लाख कंपन्या बंद’ असे फलक लावण्यात आले होते. यानंतर पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र्र भोसले यांना निवेदन दिले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शहराध्यक्ष जुबेर बागवान, जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महेबूब शेख म्हणाले, भाजप सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटी या आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे.उद्योगांवर मंदीचे सावट आले आहे. हजारो युवकांच्या नोकºया गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मेगा नोकर भरती करु म्हणून सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या पक्षात मेगा भरती चालू केली आहे.
रविकांत वरपे म्हणाले, देशातील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. राज्यात ४५ लाख तरुण बेरोजगार झाले आहेत. भाजप सरकारने राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली. त्यातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. हा पैसा एखादा उद्योग आणण्यासाठी करायला हवा होता. राज्यातील तरुणांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, राजन जाधव, जावेद खैरदी ,राम साठे,आप्पाराव कोरे,अहमद मासूलदार, चेतन गायकवाड, सुहास कदम, निशांत सावळे ,अमीर शेख, प्रशांत बाबर, विवेक फुटाणे, शाम गांगर्डे, अरविंद दामजी, प्रमोद भोसले, वासीम बुºहाण, दादाराव रोटे, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, सायरा शेख, सिया मुलाणी, लता ढेरे, प्राजक्ता बागल, शोभा गायकवाड, नसीम खान, नसीमा शेतीसंदी आदी उपस्थित होते.
फडणवीसांनी घोटाळ्यातील कंपनीला काम दिले : शेख- महेबूब शेख म्हणाले, महापोर्टल रद्द करावे, अशी तरुणांची मागणी आहे. या महापोर्टलचे काम करणारी कंपनी ही भोपाळमधील व्यापम घोटाळ्यातील कंपनी आहे. या कंपनीला मध्यप्रदेश सरकारने काळ्या यादीत टाकले आहे. फडणवीसांना महाराष्टÑात व्यापम घोटाळा करायचा का, असा आमचा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने किती गुंतवणूक आणली, किती लोकांना रोजगार आणले याची माहिती आम्हाला द्या. या राज्यातील बेरोजगार तरुणांचा अंत पाहू नका.