सोलापूर : गरिबांसाठी पूर्वी रेशन दुकानातून धान्य, महिलांना पेन्शन अशा विविध जुन्या योजना सुरू होत्या. मात्र भाजप सत्तेवर आल्यावर या सर्व योजना बंद करण्यात आल्या, असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांनी बुधवारी रात्री येथे बोलताना केला.
मौलाली चौकात आयोजित अल्पसंख्याक महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी अलका राठोड, सुशीला आबुटे, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, अॅड. करिमुन्नीसा बागवान, हासीब नदाफ, कोमारो सय्यद, काँग्रेसचे सोहेल पठाण, शौकत पठाण उपस्थित होते. प्रारंभी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर मार्गदर्शन करताना उज्ज्वलाताई शिंदे यांनी मोदी सरकार आल्यापासून गरिबांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. नोटाबंदीचा सर्वात जास्त त्रास गरिबांना झाला. शेतकºयांच्या प्रश्नांकडे या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले. शेतकºयांची कर्जमाफी नावालाच केली. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती आहे, पण यात नागरिकांना काहीच दिलासा दिलेला नाही.
लोकांना धान्य नव्हे पिण्याचे पाणी मिळत नाही. हाताला काम तर नाहीच जनावरांना चाराही उपलब्ध केला नाही. त्यामुळे स्थलांतर वाढले आहे. शेवटी ऐश्वर्या तुपलवंडे यांनी आभार मानले.