मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्याच्या घडीला न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात मुक्कामी आहेत. यातच संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे.
ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊतांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाऱ्यावर सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांच्याबाबत काळजी व्यक्त करणारे एकही वक्तव्य देण्यात आले नाही, असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं. तसेच मुळात संजय राऊत हे शिवसेनेचे नेतेच नव्हते, इतका विसर उद्धव ठाकरेंना पडला असल्याचा टोलाही प्रवीण दरेकरांनी लगावला.
महाराष्ट्राच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी लागणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी या युतीची घोषणा केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युतीवर देखील प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे.
संभाजी ब्रिगेड सोबत शिवसेनेच्या आघाडीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, आता उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच राहिले नसून बुडत्याला काडीचा आधार लागतो, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. प्रवीण दरेकर आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ज्यांनी सावरकरांवर टीका केली, ज्यांनी हिंदुत्वावर टीका केली, ज्यांनी छत्रपतींच्या आणि इतर संदर्भात वादग्रस्त भूमिका घेतल्या, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. यावरून उद्धव ठाकरे यांना अजूनही काहीच समजत नाही, हे दुर्दैव असल्याचे देखील प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.