राजकुमार सारोळे
सोलापूर : जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आणावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असले तरी महाविकास आघाडीचे सत्तेचे गणित जुळलेले नाही असे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे समविचारी आघाडीच्या हालचालींना वेग आला असून, या आघाडीतील नेत्यांच्या शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झाल्या. समविचारी आघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपबरोबर स्थानिक आघाडीच्या सदस्यांचा समावेश असेल. समविचारी आघाडीकडे ३७ सदस्य असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
झेडपीत महाविकास आघाडीची सत्ता आणावी, असे आदेश राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे गणित आमदार संजय शिंदे आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर अवलंबून आहे.
संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या बैठकांना अद्याप हजेरी लावलेली नाही, परंतु त्यांनी समविचारी आघाडीला प्राधान्य दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. म्हेत्रे आणि सुरेश हसापुरे यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ, असे जाहीर केले असले तरी सध्या हसापुरे समविचारी आघाडीच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी तेच चर्चा करीत आहेत. समविचारी आघाडीची शुक्रवारी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर हा प्रस्ताव घेऊन काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे एक बैठक झाल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही बैठकांमधून समविचारी आघाडीची सत्ता आणण्यासाठी संख्याबळ जुळविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपची मदत घेऊन गेल्यावेळेप्रमाणे समविचारीची सत्ता आणली जात असेल तर सोबत येण्याची तयारी अनेकांनी केली आहे. सुरेश हसापुरे या गटांची जुळणी करीत आहेत. नव्या समीकरणात मंगळवेढ्याला अध्यक्ष तर मोहोळला उपाध्यक्ष देण्यावर चर्चा झाली आहे.
भाजपचे नेते म्हेत्रेंच्या भेटीला- बार्शीचे भाजप नेते, आमदार राजेंद्र राऊत, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, विजयराज डोंगरे यांनी शुक्रवारी काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची भेट घेतली. यावेळी सुरेश हसापुरे उपस्थित होते. म्हेत्रेंनी समविचारी आघाडीसोबत यावे, असा आग्रह धरला. मात्र म्हेत्रे यांनीही आघाडीसमोर काही अटी ठेवल्या आहेत.
संजय शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष - करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी झेडपी अध्यक्ष होताना समविचारींची मदत घेतली होती. आता राज्यातील सरकार स्थापनेत त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सल्ल्यानुसार ते सध्या काम करीत असल्याची चर्चा आहे. अध्यक्ष निवडीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सध्या ते कोणासोबत आहेत याचा उलगडा झालेला नाही. शिंदे महाविकास आघाडीसोबत की पुन्हा समविचारीची जुळणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, मला सर्वांचे निरोप आले. मी आजारी आहे. झेडपी निवडणुकीबाबत सर्वांशी चर्चा करून शनिवारी माझी भूमिका जाहीर करणार आहे.
अध्यक्ष भाजपच्या विचारांचा असेल : पवार भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, झेडपीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भाजपच्या विचारांचा असेल. अध्यक्ष निवडीबाबत शुक्रवारी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, माजी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांची बैठक झाली. भाजपच्या पाठिंब्यावर मित्र पक्षाच्या अटी व सूचना विचारात घेऊन पदांमध्ये बदल करण्याचे ठरले. झेडपीत सत्ता स्थापन करण्यासाठी समविचारी आघाडीबरोबर ३७ सदस्य आहेत असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केला. यावेळेस भाजपसोबत आणखी नवे मित्र जोडले गेले आहेत. एकविचाराने सर्वजणांनी काम करण्याचे ठरले आहे असे ते म्हणाले.