बार्शी : जिल्ह्यासाठी येणारी कोरोनाची लस व रेमडेसिविर इंजेक्शनची पळवापळवी होत असून, जिल्ह्यावर होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार हे गुरुवार, १३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
केंद्र शासन व राज्य शासनामार्फत रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा व लसीचा पुरवठा पुणे विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. १२ एप्रिल ते १० मे या काळात रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन व कोविड लस पुरवठा करताना सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन दिले जात नाही. टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जात आहे.
या उलट पुणे विभागात इतर जिल्ह्यांना झुकते माप देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्युदरात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सारे आमदार, खासदार हे एकत्रित येत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.