सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याची कुणकूण राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली आहे. दरम्यान, संजय शिंदे यांनी गुरुवारी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांची भेट घेउन या हालचाली रोखण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सायंकाळी झेडपीच्या वतुर्ळात होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांना तीन महिने मुदतवाढ दिली आहे. मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात यावा, अशा सूचना जिल्ह्यातील भाजप नेत्यांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. आमदार सिध्दाराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील वातावरण बदलत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविता येईल, असा निर्णय दोन दिवसांपूर्वी मुंबईतील बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राउत, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हा परिषद सदस्यांची गोळाबेरीज करण्याचे ठरले. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही फोनवरुन याबाबत माहिती देण्यात आली. झेडपीत किमान ४२ सदस्यांची जुळवाजुळव होईल, असे मुंबईतील बैठकीत सांगण्यात आले आहे.
पुढं कसं करायचं.. शिंदे यांचा डोंगरेंना सवालच्संजय शिंदे आणि दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे गुरुवारी झेडपीत आले होते. या दोघांनी दुपारी विजयराज डोंगरे यांचे कार्यालय गाठले. दोघेही डोंगरे यांच्या कार्यालयात सुमारे दोन तास ठाण मांडून होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा व्हायची. संजय शिंदे अधून-मधून विजयराज डोंगरे यांना आता पुढं कसं करायचं, असा प्रश्न करीत राहिले. यावर डोंगरे यांनी काही उत्तर दिले नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. अध्यक्षपदावेळी डोंगरे यांनी शरद पवारांचा आदेश डावलून संजय शिंदे यांना साथ दिली होती. आता मात्र डोंगरे यांनी भाजपत प्रवेश केला आहे. भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या हालचालींमुळे संजय शिंदे यांनी डोंगरे यांची भेट घेउन डॅमेट कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा झेडपीच वतुर्ळात होती.