रविवारी राष्ट्रवादीचे नेते येऊन जाताच दुपारी अचानक भाजप पक्ष निरीक्षक माजी आमदार बाळासाहेब भेगडे आले. सोबत आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धैर्यशील मोहिते-पाटील, बी. पी. रोंगे, श्रीकांत देशमुख, अभिजित पाटील यांच्यासह बड्या नेत्यांनी हजेरी लावत आम्ही निवडणुकीत उतरत असल्याचे जाहीर करीत पोटनिवडणुकीचे वातावरण ढवळून काढले. त्यानंतर चार इच्छुकांची यादीही जाहीर करून टाकली. मात्र, यामध्ये मुख्य दावेदार म्हणून पुन्हा आमदार प्रशांत परिचारक किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हेच असल्याचे समोर येत आहे.
या दोघांनीही यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविली आहे. या दोघांमध्ये झालेल्या मतविभागणीचा फायदा भालकेंना प्रत्येकवेळी झाला. यावेळी हाच प्रकार थांबविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
यावेळी या दोघांपैकी एकाला उमेदवारी देताना मागीलवेळी कोणत्या गावात, कोणत्या तालुक्यात, कुणाला किती मते मिळाली, दोघांच्या मतांमधील अंतर, एकाला उमेदवारी दिली तर दुसऱ्याचे समर्थन मिळेल का..? बंडखोरी तर होणार नाही ना, त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल या प्रमुख गोष्टींचा अभ्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे. शिवाय एकाने विधान परिषद, तर दुसऱ्याने विधानसभा लढवावी, असाही प्रस्ताव पक्षाकडून दोघांना दिला आहे. मात्र, दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
आता पक्षश्रेष्ठी या दोघांची समजूत कशी काढतात
उमेदवारी नक्की कोणाला मिळेल याविषयी मतदारसंघात उत्सुकता आहे. या दोघांचे मनोमिलन करीत एकास एक उमेदवार दिल्यास सहानुभूतीच्या लाटेतही महाविकास आघाडीसमोर भाजप तगडे आव्हान उभे करण्यात नक्की यशस्वी होणार आहे.
परिचारकांसाठी फडणवीस; आवताडेंसाठी चंद्रकांतदादा आग्रही
परिचारक कुुटुंबातील व्यक्तीचा मागील दोन निवडणुकीत पराभव झाला आहे. आवताडेही पराभूत झाले असले तरी त्याची कारणे वेगवेगळी असल्याचे भाजपच्या निदर्शनास आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी समाधान आवताडे हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून उमेदवारीची चाचपणी करीत होते. त्यामुळे चंद्रकांतदादांसह एक गट आवताडेंसाठी आग्रही आहे, तर परिचारकांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक जगजाहीर आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परिचारकांसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
दोघांना वगळून तिसऱ्या पर्यायाची चाचपणी
पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून भारत भालके यांचे पुत्र किंवा पत्नीला उमेदवारी मिळणे निश्चित आहे. भगिरथ भालकेंना उमेदवारी मिळाल्यास माजी मंत्री राम शिंदे, आवताडे किंवा परिचारक यांचा विचार होईल. पत्नीला उमेदवारी दिल्यास समोर सक्षम महिला उमेदवार म्हणून शिवसेना नेत्या शैला गोडसे यांचीही चाचपणी भाजपकडून सुरू आहे.