राकेश कदम, साेलापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री आणि दाेन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला जास्तीत जास्त फायदा हाेईल या दृष्टीने काम करीत आहेत. त्यामुळे मनाेज जरांगे-पाटील यांनी संयमाने घ्यायला हवे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी साेलापुरात केले.
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी बुधवारी शहरातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी मनाेज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदाेलन करण्याचा निर्धार केला आहे. सरकार आरक्षणाच्या देण्याच्या मानसिकेतमध्ये नाही असा आराेपही पाटील यांनी केला आहे. या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या महायुती सरकारच्या निर्णयाला राज्यातील सर्व पक्षांनी साथ दिली आहे. मराठा आरक्षण देण्यास कुणाचाही विराेध नाही. पण या विषयावर संयम ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सरकारने आरक्षणाची संपूर्ण तयारी केली आहे. आरक्षणाच्या विषयात समाजाची फसवणूक हाेणार नाही. थाेडा वेळ लागला तरी पण मराठा समाजाला टिकावू आरक्षण मिळेल. मनाेज जरांगे पाटील हे सरकारची भावना समजून घेतील ही अपेक्षा आहे.