सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, राज्यात अद्याप जागांवाटपाचा तिढा सुटला नाही. तसेच, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार का? याबाबतही राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. याचबरोबर, सोलापूर जागेबाबतही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले आहे.
सोलापुरात भाजपाला उमेदवारी मिळत नाही, पण भाजपा एखादा छुपा रुस्तम उमेदवार काढेल. 2019 साली भाजपाने उमेदवार काढला, त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नव्हते, ते प्रकरण कोर्टात चालू आहे. मात्र, ते उमेदवारी बाबतीत कुणाचं काय काढतील, ते सांगता येत नाही, असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपावर निशाणा साधला.
प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळावी, अशी सोलापूर काँग्रेस सदस्यांची इच्छा आहे. उमेदवारीबाबत हाय कमांड निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे. काँग्रेसचा कोणी उमेदवार असेल, त्यासाठी जिल्हा काँग्रेसकडून तयारी केली जात आहे. तसेच, जिल्हा अध्यक्षांची अडचण असल्यामुळे प्रभारी जिल्हा अध्यक्ष नेमला आहे. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला ज्या-ज्या ठिकाणी अडचण आहे. त्या-त्या ठिकाणी काम सुरू आहे, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलले आहेत. महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर येतील. मागील निवडणुकीत त्यांना अनुभवाचे चटके बसले आहे. यातून ते सुधारतील अशी माझी कल्पना आहे. वेगळा असं काही होणार नाही. लोकांनी आता ठरवलं पाहिजे. वंचित बाबत मागच्या निवडणुकीत आलेला अनुभव, नागरिकांनी त्यातून मतदान केले पाहिजे, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.