राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर ‘दादा’, साेलापूर भाजपच्या अजूनही ‘विमानसेवा”
By राकेश कदम | Published: July 3, 2023 06:23 PM2023-07-03T18:23:35+5:302023-07-03T18:43:10+5:30
व्यापारी आघाडीने वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालय आणि विमानमंत्र्यांच्या कार्यालयाला तातडीने एक निवेदन पाठवले.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडाने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या वातावरणात भाजपच्या अजेंड्यावर अजूनही जिल्ह्यातील विमानसेवा असल्याचे साेमवारी सांगण्यात आले. हाेटगी राेड विमानतळावरुन विनाविलंब नियमित विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी भाजपच्या व्यापारी आघाडीने साेमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
व्यापारी आघाडीने वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालय आणि विमानमंत्र्यांच्या कार्यालयाला तातडीने एक निवेदन पाठविले. यात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०१७ मध्ये उडान योजनेत सोलापूरचा समावेश केला आहे. परंतु सोलापुरातील स्थानिक अडचणीमुळे विमानसेवा सुरू होत नव्हती. महाराष्ट्र शासनाने साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर केला आहे. सोलापूर हा वस्त्रोद्योग, टेक्स्टाईल, शेतीपूरक उद्योग आणि साखर उत्पादक जिल्हा आहे. येथील व्यापार रोजगार वाढीसाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम असून ते या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने सोलापुरात विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनिवास दायमा आणि व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष जयंत होले - पाटील यांनी केली.