भाजप सरकारच्या काळात ४५ लाख कृषिपंपाचे वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांना तगादा लावला नाही किंवा एकही कनेक्शन कट केले नाही. मात्र आघाडी सरकारने शेतकऱ्यांनी न वापरलेल्या वीजबिलाची ५० टक्के रक्कम भरा असा फतवा काढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील ७२ लाख घरगुती ग्राहकांना वीज कनेक्शन कट करण्याच्या नोटिसा बजावून लाखो कुटुंबांना अंधारात ठेवण्याचा घाट घातला आहे.
शंभर युनिट वीज मोफत देण्याच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे एक वर्षाचे १२०० युनिट वीजबिलातून माफ करावे. लॉकडाऊन काळात मीटर रिडिंग न घेता सरासरी अंदाजे लाखो रुपयांची वीजबिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत. या सर्व बाबींचा विचार करून महावितरणने वीजबिले दुरुस्त करून नव्याने वीजबिले ग्राहकांना द्यावीत, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली आहे.