राकेश कदम. साेलापूर : भाजपचा साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार काेण असावा याबद्दल पदाधिकाऱ्यांची मते जाणून पक्षाचे निरीक्षक मुरलीधर माेहाेळ, आमदार सुधीर गाडगीळ गुरुवारी सकाळी ११.३० वाजता साेलापुरात दाखल झाले. येथील लाेटस हाॅटेलमध्ये ते जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत.
लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा दिवसांत जाहीर हाेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपात साेलापूर लाेकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपकडून लाेकसभेसाठी विद्यमान खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, माळशिरसचे उत्तम जानकर, माजी खासदार अमर साबळे, आमदार राम सातपुते आणि सनदी अधिकारी भारत वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. साेलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जाेर धरू लागली आहे.
दरम्यान, भाजपने इच्छूक उमेदवारांची माहिती जाणून घेण्यासाठी निरीक्षक नेमले आहेत. माढा लाेकसभा मतदारसंघाचे निरीक्षक टेंभुर्णी येथे बैठक घेणार आहेत. साेलापूरची बैठक गुरुवारी दुपारी १२ पासून सुरू झाली आहे. दुपारी दाेन वाजेपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून हे निरीक्षक पुण्याला रवाना हाेणार असल्याचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.