सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे सोलापूर लोकसभा समन्वयक अमर साबळे शुक्रवारी सोलापुरात येत आहे. साबळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या महिला अध्यक्ष, युवा अध्यक्षांसह सर्व मोर्चातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल, असे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.
भाजपचा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार कोण याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी मागील निवडणुकीत या मतदारसंघातून तयारी केली होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याचे सांगण्यात आले. अजूनही सोलापूरचा उमेदवार कोण हे निश्चित झालेले नाही. मात्र पक्षाने मागील महिन्यात अमर साबळे यांच्यावर सोलापूर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविली. साबळे शनिवारी सकाळी सोलापुरात येत आहेत. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणुकीचा आढावा घेणारी बैठक होईल. बूथ यंत्रणा, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने सोपविलेली जबाबदारी याचा आढावा घेण्यात येईल. शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते आढावा सादर करतील, असेही काळे यांनी सांगितले.