सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघ सहकारमंत्री सुभाष देशमुख तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र दोन्ही मंत्र्यांनी दोनही मतदारसंघातील कामांवर लक्ष ठेवावे. विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचे वाटप व्हावे, असा निर्णय भाजपा पदाधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आला.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य रघुनाथ कुलकर्णी आणि विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत सरस्वती चौकातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, भाजपाचे शहर सरचिटणीस विक्रम देशमुख, हेमंत पिंगळे, दत्तात्रय गणपा, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
सोलापूर आणि माढ्यातील भाजपाचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. पण पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करण्याच्या दृष्टीने कामाला लागा, असे कुलकर्णी यांनी सांगितले. या बैठकीत पदाधिकाºयांना विधानसभानिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले. दोन देशमुखांनी दोनही मतदारसंघातील परिस्थितीवर लक्ष ठेवावे. हे दोनही मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपाकडे आलेच पाहिजेत, असेही सांगण्यात आले. प्रदेश कार्यकारिणीचे लोक कामांचा आढावा घेणार आहेत.
पंढरपूर-मंगळवेढ्याची जबाबदारी परिचारकांकडेच्या बैठकीत पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे देण्यात आली. - शहर उत्तरची जबाबदारी विक्रम देशमुख, मध्य - हेमंत पिंगळे, पांडुरंग दिड्डी, दक्षिण - रामप्पा चिवडशेट्टी, दत्तात्रय गणपा, अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी, मोहोळ-उत्तर सोलापूर - संजय क्षीरसागर, काळे, काशिनाथ कदम यांच्यावर देण्यात आली आहे.