मुळेगाव तांडा काँग्रेसचा भक्कम किल्ला स्व. उमाकांत राठोड यांनी तो अभेद्य ठेवला होता. त्यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने शिरकाव केला आहे. भाजपच्या संदीप राठोड यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या. काँग्रेसचे विजय राठोड यांनी नऊ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले.
मुस्ती ग्रामपंचायत १० वर्षे भाजपकडे होती. सुनील कळके, महादेव पाटील या जोडगोळीच्या वर्चस्वाला काँग्रेसच्या नेत्यांनी सुरूंग लावत १५ पैकी १४ जागा जिंकल्या. माजी सभापती कल्याणराव पाटील, भीमाशंकर जमादार यांनी तांदूळवाडीत सत्तांतर घडविण्यात नवख्या अभिजित सोलापुरे, राहुल चौधरी यांना यश आले. भाजपच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली. सिद्धाराम हेले यांचा गट पायउतार झाला. याउलट कुंभारीत घडले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप, तर स्थानिक काँग्रेसच्या अप्पासाहेब बिराजदार गटाला साथ देणाऱ्या कुंभारीकरांनी गावातही सत्तापालट केले. भाजपचे जि. प. पक्षनेते अण्णाराव बाराचारे, शिरीष पाटील, रामचंद्र होनराव यांनी स्वबळावर झेंडा रोवला. दहशत, हुकूमशाही, विकासाला खीळ, आदी मुद्दयांवर भाजपने बोट ठेवले होते.
वडजी, मुळेगाव, वरळेगाव, कर्देहळ्ळी वडगाव- शिरपनहळी येथे स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. अक्कलकोट मतदारसंघातील १४ गावांमध्ये निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी फारसे लक्ष दिले नाही, अशी खंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
---------
भाजपने भ्रमनिरास केला
जनतेने विधानसभेला भाजपला कौल दिला होता; परंतु वर्षभरातच त्यांचा भ्रमनिरास झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती, मुळेगाव तांडा, मुळेगाव, लिंबिचिंचोळी, बोरामणी, संगदरी, शिंगडगाव, वडगाव- शिरपनहळ्ळी, आदी गावांत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. यावरून हेच स्पष्ट होते, असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
----
तांदूळवाडी, मुस्ती ग्रामपंचायती आमच्याकडून गेल्या हे खरे आहे. कुंभारी यासारखी मोठी ग्रामपंचायत भाजपकडे आली. वडजी, वडगाव - शिरपनहळ्ळी , बक्षीहिप्परगे येथील मतदारांनी भाजपला साथ दिली. इतर चार ग्रामपंचायतीत सरमिसळ आहे. भाजपचा जनाधार कायम आहे
- आ. सचिन कल्याणशेट्टी,