मोहन डावरे
पंढरपूर : कार्यकर्ते, नेते यांची झालेली एकी, सहानुभूतीचा मुद्दा दूर करण्यात आलेले यश आणि महाविकास आघाडीबद्दलची नाराजी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली. सुरुवातीला राष्ट्रवादीला सोपी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात भाजपने कठीण बनविली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटणारा आत्मविश्वास निवडणुकीच्या दिवशी दिसला नाही. कोरोना काळ असतानाही भारतीय जनता पक्षाचे योग्य नियोजन, मतदारांना मतदानाला आणण्यासाठी केलेले प्रयत्न, होम टू होम प्रचार त्यांना फायदेशीर ठरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, खासदार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारसभा उपयोगी पडल्या.
सुरुवातीला या जागेसाठी कोण उमेदवार द्यायचा यात दोन्ही पक्षाचा खल झाला. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन पावले मागे घेत समाधान आवताडे यांना उमेदवारी द्यावी, असे सांगताना आपण त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शेवटपर्यंत त्यांनी ते पाळले.राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांची पाटी कोरी होती. केवळ भारत भालके यांचे चिरंजीव ही त्यांची ओळख होती. त्यांना सहानुभूती मिळेल, अशी अपेक्षा होती. भाजपने हीच सहानुभूती मिळू नये यासाठी मुद्दा विकासाकडे नेला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील हे ठाण मांडून बसले होते. अजित पवार यांनी तर अगदी दहा मते असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या. त्याचा परिणाम उलटा झाला. राष्ट्रवादीचा उमेदवार धोक्यात असल्यानेच हे मंत्री फिरत असल्याचा संदेश मतदारांत गेला.
दरवेळी भारत भालके हे स्वत: नियोजन करीत होते. त्यांच्या नंतर दुसरी फळी असली तरी त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. केवळ भालके यांना पाहून लोक मतदान करतील अशा आशेवर त्यांनी प्रचार केला. प्रत्यक्षात मतदानादिवशी उलटेच झाले. मागील तिन्ही निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातून भालके यांना मताधिक्य मिळत होते, यावेळी आवताडे यांना मिळाले. मंगळवेढा त्यांचा तालुका असल्याने हे मताधिक्य कायम राखण्यात त्यांना यश आले. त्यांचे बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनाही मतदारांनी नाकारले त्यामुळे त्यांच्या मतात फूट पडली नाही. बंडखोर शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांचाही फटका भालके यांना बसला.